चिकोत्रा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

गारगोटी  (प्रतिनिधी) भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम असून धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे नागणवाडी धरण रात्री कधीही पूर्ण क्षमतेने भरणार आहे, रात्री कधीही कधीही विसर्ग होऊन हे पाणी चिकोत्रा नदीत मिसळून नदीचा प्रवाह वाढणार आहे,त्यामुळे वेदगंगा-चिकोत्रा  पाटबंधारे उपविभाग, गारगोटीचे सहाय्यक उपअभियंता महेश चव्हाण यांनी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

    नागणवाडी धरण आज रात्री कधीही पूर्ण क्षमतेने भरणार  आहे,त्यामुळे सांडव्यावरून पाणी नाल्यामधून चिकोत्रा नदीमध्ये मिसळून नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे ओढ्या काठावरील तसेच चिकोत्रा नदी काठावरील सर्व गावांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

 धरण क्षेत्र निषिद्ध-पर्यटकांना येण्यास बंदी

जिल्ह्यात व राज्यात धरण धबधबे पाहण्यासाठी गेल्यानंतर अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत, त्यामुळे पाटबंधारे विभागाने सावधगिरी बाळगली आहे. धरणक्षेत्र हे निषिद्ध क्षेत्र असल्याने या धरणावर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आलेची माहिती वेदगंगा-चिकोत्रा  पाटबंधारे उपविभाग, गारगोटीचे सहाय्यक उपअभियंता महेश चव्हाण यांनी दिली आहे.

 पाटगाव धरण ८४ टक्के भरले-

भुदरगड तालुक्यात धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे,त्यामुळे तालुक्यातील पाटगाव,  चिकोत्रा,  धरणातील पाण्याचा साठा वाढत आहे,शिवाय वेदगंगा नदीला महापूर आला असून नदीचे पाणी आजूबाजूच्या शेत शिवारात घुसले आहे. भुदरगड तालुक्याची वरदायिनी असलेल्या वेदगंगा नदीवरील पाटगाव धरणक्षेत्रात (श्री मौनी सागर जलाशय)  गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाटगाव धरणाची पाणी पातळी आज ६२४.३६ मीटर असून एकूण पाणीसाठा ८७.४९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३०८९.७० दशलक्ष घनफुट इतका आहे. म्हणजे पाटगाव धरण आज दुपारी ३.०० वाजता ८३.१३ टक्के भरले होते. गेल्या आठ तासात पाटगाव धरणक्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस झाला असून १ जून २०२४ पासून आजपर्यंत ४१९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

 वेदगंगा नदीवरील तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली

   भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे,शिवाय पाटगाव धरणांतील विद्युत गृहातील ३०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वेदगंगा नदीत होत आहे,त्यामुळे वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे,त्यामुळे आज वेदगंगा नदीवरील तालुक्यातील म्हसवे,गारगोटी, शेणगाव निळपण,वाघापूर, करडवाडी ही सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

About The Author