पालकमंत्री खाडेंनी आणलेला अडीच हजार कोटीचा निधी गेला कुठे ? – डॉ. महेशकुमार कांबळे
फसव्या मिरज पॅटर्न व पालकमंत्री खाडेंना शह देण्यासाठी विधानसभा लढविण्याची केली घोषणा
मिरज (विनायक क्षीरसागर)
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे मागील १५ वर्षापासून मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दोन वेळा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मिरजेसाठी अडीच हजार कोटींचा विकास निधी खर्च केल्याचा दावा ते करतात. मग निवडणुकीपूर्वी त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत हे का सांगावे लागत आहे. इतकी वाईट वेळ त्यांच्यावर का आली आहे. त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्यानेच त्यांची ही धडपड सुरू असल्याची टीका एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांनी केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सल्लामसलतीने खाडेंना पराभूत करण्यास व त्यांच्या बेबंदशाही राजकारणाला शह देण्यासाठी आगामी मिरज विधानसभा निवडणूक लढवण्यास मी सज्ज असल्याचे, आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. पालकमंत्र्यांचा आणि मिरजेतील नगरसेवकांचा विकासाचा दावाही खोटा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी पालकमंत्र्यांसह मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांवर जोरदार टीका केली. मिरजेतील २० ते २२ सर्वपक्षीय नगरसेवक माझ्यासोबत आहेत. त्यांचा मला पाठिंबा आहे. या पाठिंब्याचा आणि त्याच्या आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचा आधार घेऊन भाजप पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघात अडीच हजार कोटी खर्च केल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला आहे. पक्ष भेद बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी निधी दिल्याचे नगरसेवकांनीही सांगितले आहे. माझा नगरसेवकांना प्रश्न आहे, हा निधी गेला कुठे. त्यांनी नागरिकांसमोर आणि प्रसिद्धी माध्यमांसमोर त्याचा खुलासा करावा, असे माझे त्यांना आव्हान आहे.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज रोड, भाजी मंडई, शहरातील सर्वच रस्ते, बंद पडलेले शासकीय दूध डेरीसारखे उद्योग यासाठी १५ वर्षात काय प्रयत्न केले. हे प्रश्न का सुटले नाहीत. विकास केला असेल तर अशी वेळ तुमच्यावर का आली. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची पिछेहाट झाली आहे, हे यातून स्पष्ट होते. पालकमंत्री आणि नगरसेवक हे अशा पद्धतीने येथील मतदारांना गृहीत धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनता त्याला उत्तर देईल. लोकसभेला एकाचा आणि विधानसभेला दुसऱ्याचा प्रचार करायचा यामागचे राजकारण जनतेलाही कळते. नगरसेवकांच्या पालकमंत्र्यांना दिलेल्या पाठिंब्याचा उलटा परिणाम झालेला दिसून येईल, असाही दावा डॉ. कांबळे यांनी केला. काँग्रेस नेते मला विचारून उमेदवार देतात असा दावा यापूर्वीच पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी केला आहे. आता नगरसेवकही उघडपणे त्यांच्याकडे गेले. यातून प्रत्यक्ष निवडणुकीत मिरजेत महाविकास आघाडीचा उमेदवार हा नुरा कुस्तीचा उमेदवार असेल, हे स्पष्ट होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांचाही सुरेश खाडे यांनाच छुपा पाठिंबा असल्याचाही आरोप डॉ. कांबळे यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडे तिकीटाची मागणी केली असून तिकीट मिळो अगर मिळो मात्र आपण मिरज विधानसभा लढवणारच असा दृढविश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.