सांगलीत श्री मार्लेश्वर मंडळातर्फे महिला सबलीकरण रॅली
सांगली (प्रतिनिधी)
सांगलीतील पंचशीलनगर येथील श्री मार्लेश्वर सांस्कृतिक मंडळाने अभिनव उपक्रम राबवून विजयादशमी दिनी आदीशक्तीचा जागर करणारी रॅली आयोजित केली. या रॅलीद्वारे महिला सबलीकरण यासह विविध बाबी अधोरेखित करण्यात आल्या. सांगलीतील पटेल चौक ते गणपती मंदिर अशी रॅली काढण्यात आली.
श्री मार्लेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाकडून दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असतात. प्रबोधनात्मक उपक्रम राबवून नेहमीच एक वेगळेपण जपण्याचा मंडळांने कसोशीने प्रयत्न केला आहे. मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि केएफसी बॉईजच्या सर्व सदस्यांनी यंदाही एक चांगला उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून महिला सबलीकरणाचे विविध बॅनर तयार करून विजयदशमी दिनी अर्थात दसऱ्या दिवशी रॅलीचे आयोजन केले. त्यांच्या या रॅलीत परिसरातील महिलावर्ग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकटी मुलगी ‘संधी’ नाही तर जबाबदारी, आम्ही जिजाऊंच्या लेकी सुरक्षित आहोत का ?, कलियुगातील दुःशासन गल्लीबोळात फिरत असताना आजची द्रौपदी सुरक्षित राहिलच कशी ? अशा प्रकारचे विविध पोस्टर्स मंडळाने तयार केले होते व संपूर्ण रॅलीत या घोषणा देत महिला वर्गाने सारा परिसर दुमदुमून सोडला. सदर रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल मंडळाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.