उन्नत भविष्यासाठी शाश्वत विकास आवश्यक : डॉ. ज्योती जाधव

0
WhatsApp Image 2026-10-12 at 11.56.15 AM


कोल्हापूर (प्रतिनिधी) आपला आणि देशाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आपण शाश्वत विकासाचा अंगीकार करायला हवा. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रो. डॉ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केले. त्या रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे शाश्वत विकासासाठी जैविक आणि रासायनिक विज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन या विषयावरील आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेस बोलत होत्या.

ह्या राष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना डॉ. जाधव यांनी शाश्वत विकासासाठी जैविक आणि रासायनिक विज्ञानाची सांगड आवश्यक आहे. कारण आज जग ज्या समस्यांचा सामना करते आहे. त्याची मूळे मानवी चुकामध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या उन्नत भविष्यासाठी शाश्वत विकास आवश्यक असल्याचे सांगितले.

ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भविष्यातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वैज्ञानिक संशोधन हे केवळ एकाच विषयापुरते मर्यादित न राहता आंतरशाखीय असणे गरजेचे आहे. जैविक आणि रासायनिक विज्ञानाचा हा एकात्मिक दृष्टिकोणच मानवी जीवन अधिक सुखकर आणि पर्यावरणपूरक बनवू शकतो. असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहित्य हे सुद्धा शाश्वत विकासामध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावते हे पटवून दिले. सदर परिषदेसाठी साधनव्यक्ती म्हणून प्रा. डॉ. एस. आर. यादव (कोल्हापूर), डॉ. एलियास सय्यद (पुणे), प्रो. डॉ. रवींद्र सिरसाट (गोवा) हे उपस्थित होते. त्यांनी अनुक्रमे वनस्पतीचा शाश्वत विकासातील सहभाग, वनस्पतीशास्त्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि माहिती विश्लेषणातील विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका ह्या विषयावर अभ्यासपूर्ण मते मांडली. या परिषदेस शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते. ह्या परिषदेचे प्रास्ताविक डॉ. शकील शेख यांनी केले. आभारप्रदर्शन प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे यांनी केले. तर सूत्रसंचलन डॉ. व्ही. डी. शिंदे व श्रीमती रिना फर्नांडिस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *