काम न करता लाखोच्या बिले काढणारे निलंबित

कनिष्ठ अभियंता, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक यांचा समावेश
कोल्हापूर (प्रतिनिधी)
कसबा बावडा पूर्व बाजूस ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम प्रत्यक्षात न करता बिले काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेतील तिघांचे निलंबन करण्यात आले आहे. चौघांवर विभागीय व खातेनिहाय चौकशीचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज (ता. २९) कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकाउंटंट तथा सहाय्यक अधीक्षक बळवंत सुर्यवंशी आणि वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना तातडीने निलंबीत केले. तर मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ आणि वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण यांच्यावर शासनामार्फत विभागीय चौकशीस मान्यता दिली.
याचसोबत सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सेवानिवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे आणि पवडी अकाउंटचे सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
४८ तासांत अहवालाची मुदत
या प्रकरणाचा धांडोळा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या द्वयी चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश होते. मात्र आज प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी तातडीची भूमिका घेत फक्त ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासकांनी स्पष्ट केले की, चौकशीत कागदपत्रे व पुरावे यांच्या आधारे जे अधिकारी व कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.