संकेश्वर हिरण्यकेशी साखर कारखान्यावर “जोल्लेंची” एक हाती सत्ता..

संकेश्वर (प्रतिनिधी)
संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावर माजी खासदार अण्णासाहेब ज्वोल्लेंची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली असून आज अण्णासाहेब ज्वोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे नूतन अध्यक्ष म्हणून बसवराज कल्लट्टी उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.कारखाना कार्य स्थळावर संचालक मंडळाची सभा घेऊन त्यात अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.सभेत हिरण्यकेशी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार निखिल कत्ती यांची अनुपस्थित चांगलीच जाणवली.सभेला संचालक अप्पासाहेब शिरकोळी,शिवनायक नाईक बाबासाहेब आरबोळे सुरेश बेल्लद अन्य संचालक उपस्थित होते.
हिरण्यकेशीचा चेहरा मोहरा बदलणार….
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी नंतर पत्रकारांशी बोलताना ज्वोल्ले उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले म्हणाले हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून तो विकसित करण्याचे काम आपण निश्चितपणे करुन दाखविणार आहोत.हिरण्यकेशी साखर कारखाना लिजवर ( भाडेतत्त्वावर ) देण्यास आपला विरोध राहिला आहे.हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना मोठ्या कष्टातून उभारण्याचे कार्य सहकार महर्षी दिवंगत अप्पणगौडा पाटील,सहकार शिल्पी दिवंगत बसगौडा पाटील,सहकारी नेते दिवंगत विश्वनाथ कत्ती यांनी केले.हिरण्यकेशी कारखाना सहकारी तत्त्वावर व्यवस्थित चालवून नेण्याचे कार्य आपण करणार आहोत.याकरिता आपणाला कारखाना संचालक मंडळ,सभासद ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य हवे आहे.
आपल्या हातात जादुची छडी नाही…..
हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना हाती घेतल्यानंतर लागलीच कारखान्याचा कायापालट होण्यासाठी आपल्या हातात काही जादुची छडी नाही.कारखान्याचे ६५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे.कर्जावरील व्याज चुकता करीत कारखाना हळुवारपणे ऊर्जितावस्था नेण्याचे कार्य करण्यासाठी किमान आपणाला १५ वर्षांचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले.कारखाना कार्यस्थळावर झालेल्या सभेत कारखान्याचे नूतन उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी संचालक शिवनायक नाईक, बाबासाहेब आरबोळे, हुक्केरी काॅंग्रेसचे नेते बसवराज पाटील, गडहिंग्लज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू गड्डेण्णावर यांनी आपले विचार मांडले.सभेला ज्योतीप्रसाद ज्वोल्ले निपाणीचे नगराध्यक्ष प्रविण भाटले,किरण रजपूत पवन पाटील दिपक भिसे जयप्रकाश सावंत शाम यादव कामगार संघटनेचे नेते मोहन कोठीवाले निपाणी हालसिध्दनाथ कारखान्याचे संचालक नगरसेवक अनेक मान्यवर कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत आणि आभार कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक यांनी मानले.