नाईट कॉलेजच्या प्रा. अभिजीत पाटील यांच्या अभिकल्पाची भारत सरकारकडून अधिकृत नोंदणी
‘बिहेवियरल हॅपिनेस असेसमेंट टर्मिनल’ला डिझाईन रजिस्ट्रेशन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवी वर्तणूक, भावनिक स्थिती आणि आनंदाच्या निर्देशांकाचे मूल्यमापन करण्याच्या संकल्पनेवर आधारित ‘बिहेवियरल हॅपिनेस असेसमेंट टर्मिनल’ या आधुनिक उपकरणाच्या अभिकल्पाची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयांतर्गत अधिकृत डिझाईन नोंदणी झाली आहे. देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अभिजीत आबासाहेब पाटील यांनी विकसित केलेल्या या अभिनव संकल्पनेला मिळालेले हे अधिकृत बौद्धिक संपदा संरक्षण संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
या संशोधनामध्ये प्रा. अभिजीत पाटील यांच्यासह डॉ. गणेश टेकळे, डॉ. राहुल म्होपरे, कु. नम्रता पाटील, अमृत चव्हाण आणि सुरज चिगरे या सहा संशोधकांचा सहभाग आहे. मानवी वर्तन आणि आनंद या सामाजिक व मानवी जीवनाशी निगडित संकल्पनांचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करण्याच्या उद्देशाने या उपकरणाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये ताणतणाव, बदलती जीवनशैली, कामाचा वाढता दबाव आणि सामाजिक बदल यामुळे मानसिक आरोग्य व भावनिक स्वास्थ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यक्तीची आनंदाची पातळी, भावनिक स्थिती आणि वर्तणुकीतील बदल यांचा अभ्यास करणे समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षण, व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकासाच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘बिहेवियरल हॅपिनेस असेसमेंट टर्मिनल’ ही संकल्पना लक्षवेधी ठरते. मानवी वर्तणूक आणि आनंदाशी संबंधित निर्देशांकांचे मूल्यमापन करण्यासाठी आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या संशोधनामागील प्रयत्न आहे. भविष्यात या संकल्पनेचा उपयोग संशोधन, शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन, कर्मचारी कल्याण, मानवी संसाधन विकास तसेच आनंद व मानसिक स्वास्थ्याशी संबंधित अभ्यासामध्ये होण्याची शक्यता आहे.
या संशोधनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजशास्त्रातील मानवी वर्तनाच्या अभ्यासाला आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची जोड देण्यात आली आहे. सामाजिक विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष उपकरणाच्या स्वरूपात विकसित करण्याचा हा प्रयत्न बहुविषयक संशोधनाला चालना देणारा ठरत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाबरोबरच संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा निर्मितीला वाढते महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर नाईट कॉलेजचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अभिजीत पाटील यांचे हे कार्य विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
प्रा. अभिजीत पाटील यांच्या या यशामुळे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजीच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामध्ये आपल्याला खंजिरे शिक्षण संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजिरे आण्णा, इचलकरंजी इंडस्ट्रिअल इस्टेटचे राहुलसाहेब खंजिरे तसेच प्राचार्य डॉ वीरूपाक्ष खानाज यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रा अभिजीत पाटील यांनी सांगितले. सामाजिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून, प्रा. अभिजीत पाटील व त्यांच्या संशोधक टीमचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


