वडगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करा – खासदार धैर्यशील माने

0
WhatsApp Image 2025-06-03 at 9.02.55 PM

कोल्हापूर (प्रतिनिधी)

वडगाव परिसरातील वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथील लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल हे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय म्हणून उभारण्याचा प्रस्ताव तात्काळ तयार करण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी प्रशासनाला दिले आहेत. फक्त नूतनीकरण न करता प्रशस्त जागेत हे रुग्णालय नव्याने उभारण्यात यावे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी ही मागणी लावून धरली. यावेळी आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपाचे उपायुक्त नंदू परळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, मुख्याधिकारी सुमित जाधव, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, रंगराव पाटील बावडेकर, सुकुमार पाटील, शिवप्रभू अक्षय मदने तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कृती समिती पदाधिकारी आदी उपस्थित होते.

खासदार माने म्हणाले, “वडगाव परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालय आवश्यक आहे. लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल हे जुन्या इमारतीत नूतनीकरण करून चालणार नाही. प्रशस्त जागेत नवे हॉस्पिटल उभारावे. तसेच कामगारांकरिता राज्य कामगार विमा दवाखान्याच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी.”

कामगार हा इचलकरंजीचा आत्मा असून त्यांच्यामुळेच इचलकरंजी इंडस्ट्री सुरु आहे. कामगारांच्या गैरसोयी, त्यांच्या अडीअडचणी दूर होण्यासाठी कामगार विभागाने प्रयत्न करावेत. इचलकरंजीतील राज्य कामगार विमा दवाखान्याच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु होण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही रुग्णालयांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, वडगाव येथील 100 खाटांच्या नव्या सुसज्ज हॉस्पिटलसाठी जागा निवडण्याचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल. निधी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. कामगार विमा दवाखान्याच्या नूतनीकरणासाठी जवळील टीबी क्लिनिकचा पर्यायही तपासला जात आहे.

दरम्यान, कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांशी अरेरावीच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील, आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *