३३ वर्षांनंतर भेटले, वर्गात बसले आणि जुन्या आठवणीत रमले

समाज विकास विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
शिराळा (प्रतिनिधी) तब्बल ३३ वर्षांनंतर ते एकत्र आले, जुन्या आठवणीत रमले आणि पुन्हा एकदा विद्यार्थी व्हायचं म्हणत वर्गात बसत सागावच्या समाज विकास विद्यालयाचे १९९१-९२ चे माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत रमले. निमित्त होते स्नेहमेळाव्याचे. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार केला.
शिराळा तालुक्यातील सागाव येथील समाज विकास विद्यालयातील १९९२ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी मुख्याध्यापक बी. डी पवार, एक. एम. इंगवले, बी. एन. पाटील, आर. डी पाटील, ए. एल. अतिग्रे, बी. एम. पाटील, ए.बी. चव्हाण, एस. जे. दहिटणकर, एस. एस. पाटील, टी. आर. नांगरे यांचा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सत्कार केला.

अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याने सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन आणिदीपप्रज्वलनन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी चहापान, अल्पोपहार आणि स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास ३३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. डी. पवार, आर. डी. पाटील, ए. एल. अतिग्रे, मुख्याध्यापक आर. पी. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक एस. जे. दहिटणकर यांची भाषणे झाली. विजय पाटील यांनी स्वागत, अशोक साळुंखे यांनी प्रास्ताविक इणूस मणेर यांनी सूत्रसंचालन केले तर सदाशिव कांबळे यांनी आभार मानले. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी सागाव येथील सर्व मित्रांनी परिश्रम घेतले.