थार गाडीतून गुटख्याची तस्करी रत्नागिरीचा तरुण जेरबंद; मिरज ग्रामीणची कारवाई

16 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त
मिरज (प्रतिनिधी):- प्रतिबंधित तंबाखू आणि गुटक्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यास मिरज ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनासह प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याचा साठा असा सुमारे १६ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. २७ जुलै रोजी बेडग रोडवरील आडवा रस्ता येथे पोलिसांनी ही कारवाई केली. सदरचा प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा वाहनातून कर्नाटकातील मंगसुळी येथून रत्नागिरी येथे नेला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संकेत शिवाजी चव्हाण (वय २० वर्ष, रा. फणसोप हायस्कूल जवळ, रत्नागिरी) याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६१ हजार दोनशे रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याचा साठा, १५ लाख रुपये किमतीची थार गाडी व एक लाख रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे १६ लाख ६१ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बेडग रोडवरील आडवा रस्ता येथे वाहनांची तपासणी केली.
यावेळी कर्नाटकाकडून एक काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी सदर वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटख्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता संबंधिताने कर्नाटकातील मंगसुळी येथून माळी नामक व्यक्तीकडून सदरचा सुगंधी तंबाखू व गुटख्याचा साठा आणल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी रत्नागिरी येथील सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनिल गुरव, उपनिरीक्षक अझर मुलाणी, सहायक उपनिरीक्षक प्रकाश साळुंखे, सहायक उपनिरीक्षक प्रविण यादव, वसंत कांबळे, सागर कोरे, स्वप्रील भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.