जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील : आ. जयंत पाटील

0
WhatsApp Image 2026-10-28 at 1.05.04 PM

मिरजेत प्रचार सभेत कपबशी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन

मिरज (प्रतिनिधी)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण असून, जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मिरज येथील मार्केट यार्डमधील शेतकरी भवन येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, मिरज तालुक्यातील सोसायटी गटाची निवडणूक महत्त्वाची असून, अण्णासाहेब कोरे, कृष्णा धोंडी कांबळे आणि संभाजीराव बाबूराव कचरे (आबा) या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार सुरू असून, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. बँकेचा कारभार अधिक सक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे आणि कपबशी या निवडणूक चिन्हावर मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असून, चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे. सहकारी संस्थांमध्ये राजकारण आणण्याऐवजी शेतकरी आणि सभासदांचे हित जपले पाहिजे. पतसंस्था व अन्य सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. जिल्हा बँक राज्यातील अग्रगण्य बँकांपैकी एक असून, तिचा कारभार पारदर्शक पद्धतीने सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार सर्वसामान्यांशी जोडलेले असून, त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. मिरज तालुका जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे मतदारांनी तिन्ही उमेदवारांना मतदान करून विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सभेला कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक संजय मेंढे, विष्णू माने यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, मनपातील नगरसेवक कार्यकर्ते आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *