आरग परिसरात ऊस वाहतुकीची चार वाहने पेटविली; ऊस दराचे आंदोलन चिघळले
मिरज (प्रतिनिधी)
ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मिरज पूर्व भागात अधिक तीव्र झाले आहे. शनिवारी आणि रविवारी भोसे येथे सुमारे शंभर ट्रॅक्टर अडविण्यात आले. तर रविवारी रात्री उशिरा आरग परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरग आणि लक्ष्मीवाडी परिसरात ऊस वाहतुकीची ही वाहने लक्ष्य करण्यात आली. अज्ञात व्यक्तींनी ही वाहने पेटविल्याचे समजते. त्यामुळे ऊस वाहतूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, रविवारी भोसे येथे दत्त इंडिया कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १०० ट्रॅक्टर अडविण्यात आले. ऊस दराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केले आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र, ऊस वाहतूक रोखणे आणि वाहनांना आग लावण्याच्या घटनांमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.


