डॉ. विजयकुमार माने यांच्या ‘गझल ओनामा’ गझलसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
येथील गझलकार डॉ. विजयकुमार स. माने यांच्या ‘गझल ओनामा’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि बायसिंगर मेमोरियल लायब्ररी, मिरज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार सुधाकर इनामदार होते. ज्येष्ठ कवी भीमराव धुळूबुळू यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अनिता नातू यांनी गणेशवंदना केली, तर डॉ. चिदानंद चिवटे व अर्जुन लोंढे यांनी डॉ. माने यांच्या गझलांचे गायन केले.
डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी संग्रहाचा आढावा घेत डॉ. माने यांनी गझलेचे तंत्र आत्मसात केल्याचे सांगितले. सुधाकर इनामदार यांनी कविता व गझल यांतील फरक स्पष्ट केला. वैद्यकीय सेवेतून वेळ काढून साहित्यसेवा करणाऱ्या डॉ. माने यांचे भीमराव धुळूबुळू यांनी कौतुक केले.
यावेळी सुनील इनामदार, आनंदहरी, अंजली गोखले, डॉ. राजश्री पाटील, ईश्वर रायण्णावर, मेहबूब जमादार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले.
यानंतर गझलकार वैभव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यात अविनाश सगरे, आनंदराव जाधव, विनायक कुलकर्णी, डॉ. स्वाती पाटील, नंदिनी पाटील, गजानन पाटील, नीता शिराळकर, हेमंत भुरके, सरिता चौगुले, भाग्यश्री पाटील, विशाल कुरणे, आलताब मुजावर, संजय पाटील, प्रकाश वायदंडे, डॉ. प्रिया पाटील, अनिल पाटील, शंकर भजनावळे, ऋषिकेश इंगळे, विलास संकपाळ यांच्यासह २२ कवींनी कविता सादर केल्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. शैलजा माने व चित्रकार अनिल दबडे यांनी संयोजन केले.


