सात वर्षांपासून फरार असलेल्या टाक गँगच्या दरोडेखोरास मिरज पोलिसांनी केले जेरबंद
मिरज (प्रतिनिधी)
मागील ७ वर्षांपासून फरार असलेल्या आंतरराजीय दरोडेखोरास जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले आहे. सदरचा दरोडेखोर हा कुख्यात टाक गॅंगचा सदस्य आहे. अटक केलेल्या दरोडेखोराविरुद्ध महाराष्ट्र व अन्य राज्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यास शोधून काढले.
करणसिंग गगनसिंग टाक (रा. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, उपनिरीक्षक विनायक मसाळे, निलेश कदम, राजेश गवळी, नितीन मोरे, झाकीर काझी, श्रीकांत केंगार, योगेश विटेकरी, असिफ सय्यद, स्वप्निल नायकोडे यांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या करणसिंग टाक या दरोडेखोराविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यात दरोडा, घरफोडी, सरकारी नोकरांवर हल्ला, आर्म ॲक्ट अशा प्रकारचे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सात वर्षांपूर्वी १२ जानेवारी २०१९ मध्ये मिरजेत एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले होते. या वाहनातील ४ दरोडेखोर पळून गेले होते, तर एकास पोलिसांनी अटक केली होती. यावेळी वाहनातून लॉक कटर, कटावण्या, लोखंडी पाईप, चाकू, गुप्ती, मिरची पूड असे दरोड्याचे घातक साहित्य सापडले होते. कुख्यात टाक गॅंग मिरजेत दरोडा टाकण्यासाठी आली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा कट उधळला होता. वाहतूक शाखेचे तत्कालीन उपनिरीक्षक जालिंदर जाधव, कर्मचारी कुंभार, माने यांनी कारवाई केली होती. यावेळी पळून गेलेल्या चार आरोपींपैकी वरील दरोडेखोरास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.


