मिरजेत विसर्जन मिरवणूक ३४ तासहुन अधिक काळ ; चैतन्य पर्वाची उत्साहात सांगता

प्रथम श्री शिवाजी मंडळ तर शेवटी पोलिसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेली अनंत चतुर्दशी दिवशीची मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक यंदाच्या वर्षी तब्बल ३४ तासांहून अधिक काळ झाली. मिरजेतील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीने प्रारंभ झाला. सकाळी सर्वप्रथम महानगरपालिकेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले, तर सर्वात शेवटी पोलिसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वप्रथम श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे तर सर्वात शेवटी धनगर राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे गणेश तलाव येथे विसर्जन झाले. कृष्णा घाट येथेही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरजेच्या मानाच्या असणाऱ्या मिरजेचा राजा श्रीमंत गजराज मंडळाच्या गणेशाचे रात्री ४ दरम्यान विसर्जन झाले.
पोलिस प्रशासनाचे श्रींचे विसर्जन झाल्यानंतर मिरजेतील यंदाच्या उत्सवाची सांगता झाली. प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला. गतवर्षी देखील विसर्जन सोहळा बराच काळ लांबला होता. मागील वर्षी ३० तर यंदा त्यामध्ये ४ तासांची भर पडली. यंदा मात्र डीजेचा दणदणाट प्रशासनाच्या दणक्यामुळे आटोक्यात आल्याचे चित्र होते. मोजक्याच मंडळांनी सामाजिक विषयांवर हलते देखावे सादर करून नागरिकांचे प्रबोधन केले. अनेक मंडळांनी ध्वनी क्षेपकांना फाटा देत पारंपरिक मर्दानी खेळ, ढोल ताशांचा निनाद अशा वातावरणात उत्सवाची सांगता झाली.
पोलीस प्रशासन व मनपाने गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. नदीवेस विठ्ठल मंदिर येथील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाने सकाळी नऊ वाजता मिरवणुकीला प्रारंभ केला. सजवलेल्या बैलगाडीतून व पालखीतून गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत मंडळाचे कार्यकर्ते व महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वाद्यपदकांसह निघालेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मिरवणुकीस भेट देऊन स्वागत केले. त्याचबरोबर मिरजेतील श्रीमंत महागणपती या मंडळानेही सकाळच्या दरम्यान पारंपारिक पद्धतीने गणेश मूर्तीची मिरवणूक काढली. यानंतर दुपारपासून शहराच्या विविध भागातून गणेश मूर्ती मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर दाखल होऊ लागल्या.
सायंकाळपासून शहरात लगतच्या ग्रामीण भागातून व जिल्हाभरातून भाविक यायला सुरुवात झाली. किसान चौक, महाराणा प्रताप चौक, हिंदमाता चौक यासह मिरवणूक मार्गावर विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थांकडून स्वागत कमान व स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, किशोर जामदार युवाशक्ती, विश्वशांती संघटना, हिंदू एकता आंदोलन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट यासह स्वागत कक्ष व कमानी उभारण्यात आल्या होत्या. खा. विशालदादा पाटील, राज्याचे माजी मंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, जनसुराज्यशक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, हातकणंगलेचे आ. अशोक माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पूर्वीपासूनच मिरवणुकांमध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यात येऊ नये याबाबतचे प्रबोधन करण्यात येत होते. पोलिसांनीही तशा सूचना देत कारवाईची इशारा दिला होता. मात्र तरीही गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला. अनेक मंडळांनी ध्वनि मर्यादेचे उल्लंघन करणारे ध्वनिक्षेपक लावले. तर अनेक मंडळांनी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत पारंपारिक वाद्यांचा वापर केला. या मिरवणुका अतिशय प्रेक्षणीय आणि लोकप्रिय ठरल्या. या मंडळांनी मिरवणुकीसाठी लेझीम पथक, झांजपथक, हलगी, नाशिक ढोल, धनगरी ढोल, ताशा, ढोली बाजा, बँड यासह पारंपारिक कला पथकांना पाचारण केले होते.
मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. ८ उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, ८६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, विविध पदांवरील ५३६ पोलीस कर्मचारी, ९ राखीव पोलीस दल, २३६ होमगार्ड नियुक्ती करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. बंदोबस्तामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या मोठी होती. पोलिसांनी मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी पोलीस गर्दीमध्ये नागरिकांना मदत करताना दिसत होते. महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन मिरवणुकीसाठी नियोजन करण्यात आले होते. गणेश तलाव येथे मोठ्या आकाराच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी ४ क्रेन उपलब्ध होत्या. त्याचबरोबर तराफेही मोठ्या संख्येने ठेवण्यात आले होते. महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी बोटीसह सुरक्षेसाठी नियुक्त होते. तराफे, क्रेन वरून केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी बोटीद्वारे महापालिका कर्मचारी मदत करीत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार तब्बल २४० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या शेकडो गणेश मूर्तींचेही अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करण्यात आले. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तब्बल ८० ते ९० मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे क्रेन द्वारे गणेश तलाव येथे विसर्जन करण्यात आले. यंदाच्या वर्षी मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींची संख्या वाढल्याने क्रेन द्वारे त्यांचे विसर्जन करण्यासाठी विलंब होत होता.
महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. शेकडो मंडळे आणि लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले. विसर्जन मिरवणूक नंतर लगेचच महापालिकेने मिरवणूक मार्गावर तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबवली. मिरवणुकीदरम्यान महापालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी कार्यरत होते. त्याचबरोबर पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शहरात स्वच्छतेचे काम सुरू केले. तब्बल ५० टन अधिक कचरा महापालिकेकडून संकलित करण्यात आला, असे उपयुक्त स्मृती पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.
शांतता प्रिय मिरजकरांचे पोलीस दलाकडून आभार..
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन सोहळ्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेश भक्तांनी व नागरिकांनी उत्साहात हा सोहळा पार पडला. कुठलीही विपरीत घटना न घडता शांततेत हा सोहळा पार पडला. मिरजेतील सर्व शांतता प्रिय नागरिकांचे सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आभार व्यक्त करत आहोत असे उपविभागीय पोलीस अधिकरी प्रणील गिल्डा यांनी सांगितले.