उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

0
म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू (2)

म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू

मिरज (प्रतिनिधी)

म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू पूर्ण झाल्याने जत तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

बेळंकी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार गोपीचंद पडळकर, कार्यकारी संचालक ह. तु. धुमाळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, स्वाती खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे. टेंभू व म्हैसाळसारख्या योजनांमुळे दुष्काळी भागात नंदनवन फुलत आहे. प्रकल्पातील दोन लाईन पूर्ण झाल्या असून तिसऱ्या लाईनसाठीही सकारात्मक प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार विशाल पाटील यांनी प्रकल्पाची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्याची मागणी केली तसेच वंचित गावांचे सर्वेक्षण करून त्यांना पाणी देण्याची सूचना केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील ६५ गावांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत विस्तारित योजनेसाठी २०२६-२७ मध्ये १ हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी केली. नाबार्डमधील ९०० कोटींच्या तरतुदीबद्दल त्यांनी आभार मानले. बोर नदीवर बॅरेज बांधणे व जुने तलाव दुरुस्त करण्याचीही त्यांनी मागणी केली.

या योजनेचे सिंचन क्षेत्र २६,५०० हेक्टर असून ५ अ.घ.फु. पाणीवापर आहे. ६५ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. ५७ किमीपैकी ५१ किमी (९१%) काम पूर्ण झाले असून दोन वितरण कुंडांचे काम पूर्ण झाले आहे. बोगदा कामाचा अंतिम स्फोट घेऊन ब्रेकथ्रू करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी, लोकप्रतिनिधी, अभियंते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *