साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव – डॉ. मोहन पाटील

0
sammelan photo

मिरजेत नामदेव चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)

संमेलन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नामदेव चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनात ते बोलत होते.

डॉ. पाटील पुढे म्हणाले की, साहित्य संमेलनांशिवाय साहित्याचा जागर होत नाही. ही संमेलने लेखकांना लेखनासाठी प्रेरणा देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी साहित्य संमेलने भरतात, हे राज्याचे मोठे वैभव आहे. विविध साहित्य संस्थांच्या कार्यामुळे समाजातील माणसांची मने शुद्ध व विकसित होत आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. आपल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. साहित्य माणसाला आनंद व विचारांची दिशा देते, त्यामुळे वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. साहित्य संमेलनांमुळे समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कवी धनदत्त बोरगावे यांच्या ‘सुख स्वप्नांचा झुला’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. मोहन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर डॉ. हर्षवर्धन भोसले लिखित ‘होमिओपॅथी माईंड इंडेक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शिरीष चव्हाण यांच्या हस्ते झाले.

नामदेव भोसले स्मृती पुरस्कारांचे वितरण डॉ. मोहन पाटील, स्मृती पाटील, गौतमिपुत्र कांबळे व डॉ. शिरीष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते सुनील इनामदार, पत्रकार व इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकर, निसर्गप्रेमी व वन्यजीव मित्र प्रदीप सुतार तसेच मिरज विद्यार्थी संघ या संस्थेचा समावेश होता.

शब्दांगण साहित्य पुरस्कारांचे वितरण गौतमिपुत्र कांबळे व डॉ. विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते झाले. चैतन्य माने पुरस्कार हा धर्मवीर पाटील यांच्या ‘दिवस कातर होत जाताना’ या कवितासंग्रहास, विवेक माने स्मृती पुरस्कार हा महादेव माने यांच्या ‘वसप’ या कथासंग्रहास, ऋजुता माने स्मृती पुरस्कार हा डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या ‘नाही उमगत ती अजूनही’ या कवितासंग्रहास तर शब्दांगण विशेष साहित्य पुरस्कार हा प्रा. एम. एस. राजपूत यांच्या ‘किमयागार’ या आत्मचरित्रास तसेच विजय माळी यांच्या ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचन’ या पुस्तकास प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत डॉ. विजय माने यांनी केले, तर प्रास्ताविक भीमराव धुळूबुळू यांनी केले. यावेळी डॉ. प्रताप भोसले, नगरसेविका विद्याताई नलावडे, महेश कराडकर, सुधीर कदम, अभिजित पाटील, मनोरमा भोसले, प्रणव माने, रघुवीर चव्हाण, इमाम पटेल, शांताराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. संयोजन संजय मरडी व रमेश हेगाणा यांनी केले. आभार प्रदर्शन बसगोंड कबाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन नाना हलवाई यांनी केले.

सुरुवातीस लता ऐवळे कदम यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. त्याचे उद्घाटन स्वागताध्यक्ष रियाज मुजावर यांनी केले. या कविसंमेलनात लवकुमार मुळे, डॉ. स्वाती पाटील, विवेक वैद्य, प्राचार्य सदाशिव भोसले, आनंदहरी, मोहन राजमाने, नंदिनी पाटील साळुंखे आदी सुमारे तीस कवींनी सहभाग घेतला. कविसंमेलनाध्यक्ष लता ऐवळे कदम म्हणाल्या की, कविता ही सहज आणि वास्तवातून उमललेली असावी. त्यांच्या ‘बाप’ व ‘धागा’ या कवितांना विशेष दाद मिळाली. यावेळी अ. भा. नाट्यपरिषद, मिरज शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. विजय माने यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *