बिसूरमध्ये पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलचे उन्हाळी शिबिर उत्साहात
सांगली (प्रतिनिधी)
येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले. 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शिबिर घेण्यात आले असून, एकूण 26 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिराचे उद्घाटन सरपंच सतीश निळकंठ व विकास सोसायटीचे चेअरमन सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उन्हाळी सुट्टीत मुलांनी टीव्ही व मोबाईलपासून दूर राहून खेळ, व्यायाम व सर्जनशील उपक्रमांकडे वळावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली. लाठीकाठी, लेझीम, नृत्य, योग, ध्यान, कवायत तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. याशिवाय शैक्षणिक चित्रपटांद्वारेही विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धनाचा अनुभव देण्यात आला.
“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत बिसूर ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांना फळांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. मोहन पाटील, माजी सभापती संपतराव भगत, तंटामुक्त समिती अध्यक्ष संभाजी पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, विलास पाटील, उद्योजक भारत पाटील, अधिक पाटील, नंदकुमार कांबळे, वसंत सावकर, शिवाजी पाटील, संजय पाटील, अनिल पाटील तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे संयोजन विद्या पाटील व सर्व शिक्षकवृंदांनी केले.


