नसरापूर प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; सांगलीत ब्राह्मण सभेचे निवेदन
सांगली (विनायक क्षीरसागर-प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ ब्राह्मण सभा, सांगलीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निवेदन देण्यात आले. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नसरापूर येथे घडलेली ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तसेच संबंधित आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येत असून, अशा गुन्हेगारांना जामिनावर मुक्त ठेवणे धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ब्राह्मण सभेने या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी कठोर शिक्षेची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी शासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी नीताताई केळकर, नगरसेवक मोहन वाटवे आणि अध्यक्ष केदार खाडिलकर यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. निवेदनाचे वाचन संजय रुपलग यांनी केले.
विष्णू बर्वे, अरुण कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, मंगेश ठाणेदार, रणजीत पेशकार, गौरी बर्वे, विनायक कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, ओमकार कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, दत्तात्रय रेठरेकर, गोविंद कुलकर्णी, श्रेयस गाडगीळ, मनोज देवधर, पूर्वा गरग, योगेश कुलकर्णी, प्रसाद करमरकर, शैलेश केळकर, किरण कुलकर्णी, संजय जोशी, अमोल कुलकर्णी, महेश कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, विश्वेश फडणीस, सुभाष कपूर, मेघना नेने, अनघा कुलकर्णी यांच्यासह ब्राम्हण सभेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारून उपस्थितांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.


