विद्या प्रबोधिनी येथे आएएस टॉपर्स टॉक संपन्न
विद्या प्रबोधिनी येथे आएएस टॉपर्स टॉक संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : युपीएससी परिक्षा केवळ ज्ञानाची परीक्षा नसून ती जिद्द, चिकाटी आणि संयमाची परीक्षा आहे. अभ्यासक्रमाचा अवाका लक्षात घेवून योग्य नियोजन आणि शिस्तशीर अंमलबजावणी केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. असे मत विद्या प्रबोधिनी कोल्हापूर येथे आयोजित आयएएस टॉपर्स टॉक या कार्यक्रमात सहभागी यशवंतांनी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्या प्रबोधिनी शिष्यवृत्तीचे विद्यार्थी व यंदाचे युपीएससी यशवंत हर्षवर्धन पाटील, ओंकार फडतरे व रोहित हे उपस्थित होते. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील यांनी परीक्षेचे सायकल लक्षात घेवून पूर्व आणि मुख्यची त्या त्या वेळी तयारी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातील बराच गोंधळ होतो मात्र आपल्या चुकांना प्रामाणिकपणे शोधून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी भरपूर सराव परीक्षा द्यायला हव्यात असे त्यांनी सांगितले.
ओंकार फडतरे यांनी व्यक्तिमत्व विकास ही पटकन घडणारी गोष्ट नसून त्यासाठी महाविद्यालय काळापासूनच प्रयत्न करणे संयुक्तिक असल्याचे संगीतले. कॉलेजचे गुण उत्तम राखण्याबरोबरच विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे, अवांतर वाचन, छंद जोपासना यांनी व्यक्तिमत्व विकास साधला जावू शकतो असं ते म्हणाले. तर रोहित मालवेकर यांनी आपले शालेय शिक्षण ग्रामीण भागात व मराठी माध्यमात झाले असून देखील त्याने तयारीमध्ये कोणतीही अडचण आली नसल्याचे अधोरेखित केले. स्वतःवर तीव्र विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने स्वतःमध्ये सुधारणा करणे युपीएससी मधल्या यशासाठी लाभदायक ठरते अस ते म्हणाले.
‘आयएएस’च्या तयारीमध्ये नियमित वृत्तपत्र वाचन अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिनही टप्प्यांवर त्याचा उपयोग होतो. तयारी काळात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे आवश्यक असून मेडिटेशन, नियमित व्यायाम इ करणे फायद्याचे ठरते. शिवाय अभ्यासाच्या दृष्टीने सोशल मीडिया पूर्ण वर्ज्य करून त्याबाबतीत झिरो टॉलरेन्स अमलात आणणे योग्य असे मत तिन्ही यशवंतांनी व्यक्त केले.
यावेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी यूपीएससी तयारी संदर्भात प्रबोधिनी राबवत असणाऱ्या विविध कोर्सेस आणि शिष्यवृत्तींची माहिती दिली. अलीकडील काही निकालांचा दाखला देत कोल्हापूर मधून UPSC तयारी शक्य असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक अमित लव्हटे व नितीन कामत उपस्थित होते.


