‘मोदींची तपपुर्ती’ दिनदर्शिकेचे अमित शहा यांनी केले कौतुक

0
1001759791

सांगली (प्रतिनिधी)

भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपपुर्ती’ या विशेष दिनदर्शिकेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केले. कोल्हापूर येथे दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन श्री पाटील यांनी त्यांना या दिनदर्शिकेची प्रत भेट दिली.

मराठीतून काढलेली ही दिनदर्शिका सरकारच्या १२ प्रभावी निर्णयांवर चर्चा घडवते. मातृभाषेतून सामान्य माणसापर्यंत विकासपर्वाची माहिती पोहचवणे ही उत्तम संकल्पना असल्याचे श्री. शहा यांनी म्हटले. भारतीय विकास पर्वाची तपपुर्ती, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालास १२ वर्षे पूर्ण झाली. या काळात त्यांच्या नेतृत्वात युती सरकारने घेतलेल्या १२ लोकप्रिय योजनांवर आधारित दिनदर्शिका पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे. त्याचे अनावरण गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले होते.

देशात २०१४ साली ऐतिहासिक सत्तांतर झाले. मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी पंतप्रधान म्हणून १२ वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला. त्यात त्यांनी देशातील सामान्य नागरिकाचे आयुष्य सुखकर करणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यात डिजीटल इंडिया, थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करणारी योजना, महिलांना धुरमुक्त करण्यासाठी उज्वला गॅस योजना, आत्मनिर्भर भारताची संकल्पना सत्तयात उतरवणारी मेक इन इंडिया योजना, आयुष्यमान भारत योजनेतून सर्व भारतीयांना आरोग्य वीमा संरक्षण अशा योजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत.

शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक आनंददायी, सुरक्षीत करण्यासाठी केलेले काम लक्षवेधी आहे. प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न साकार होत आहे. ही मांडणी प्रभावी झाल्याचे कौतुक करत अमित शहा यांनी पृथ्वीराज पाटील यांना शाबासकी दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अमल महाडिक हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *