लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यामंदिरात रंगला योगोत्सव
कोल्हापूर. (प्रतिनिधी) निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं. हा सुविचार फक्त फळ्यावर न लिहिता, तो आज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला! निमित्त होतं ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चं. मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर येथे आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा आणि कमालीच्या उत्साहात साजरा झाला. नेहमी गणिताची आणि विज्ञानाची उत्तरं शोधणारे विद्यार्थी आज चटईवर योगासनांचे अवघड पोझेस अगदी सहज करताना दिसले.
मार्गदर्शक सीमा जोशी यांच्या सोप्या आणि रंजक मार्गदर्शनाखाली शाळेच्या मैदानावर योगसाधना सुरू झाली. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणारे वृक्षासन, ताडासन, भुजंगासन, पर्वतासन आणि चक्रासन अशा विविध आसनांची कडक प्रात्यक्षिके सादर केली. आसनांनंतर मनाला शांतता देणाऱ्या ज्ञानासन, भ्रामरी आणि अनुलोम-विलोम या प्राणायामांनी वातावरणात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली.कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक करून केले. मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत राहण्यासाठी रोज योग करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, योग मार्गदर्शक सीमा जोशी, विजयसिंह खाडे पाटील, शशिकांत मोरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी.आर.पिंपळकर यांनी सर्वांचे आभार मानले. “योगाचा ध्यास, निरोगी जीवनाचा श्वास!” अशी शपथ घेत आजचा हा ‘योगोत्सव’ संपन्न झाला.



