दिव्यांग सागरला आ. खाडे यांचा मायेचा आधार; दैनंदिन वापरासाठी दिले बॅटरीवरील तीनचाकी वाहन
मिरज (प्रतिनिधी)
दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या सागर अंकलखोपे या तरुणाला आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी वैयक्तिक पुढाकारातून बॅटरीवरील तीनचाकी वाहन देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. हे वाहन खाडे कुटुंबीयांनी वैयक्तिकरित्या भेट दिले.
सागर हा तीनचाकी सायकलवरून नारळ विक्री करून कुटुंबाला हातभार लावतो. त्याच्या जिद्दीची जाणीव असलेल्या खाडे यांनी यापूर्वीही त्याला दोनदा तीनचाकी सायकली दिल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून बॅटरीवरील वाहनाची मागणी करणाऱ्या सागरची इच्छा त्यांनी पूर्ण केली. नगरसेवक मोहन वाटवे यांनी जागो मोशन टेक्नोलॉजी प्रा. लि.चे संचालक शाम गुरव यांच्या सहकार्याने सागरला सहज वापरता येईल असे वाहन तयार करून घेतले.
यावेळी पवन भोसले, दिनेश मसळे, डॉ. बी. टी. कुरणे, भाजपचे महेश फोंडे, संगीत महोत्सवाचे सचिव विनायक गुरव आणि सागरची आई उपस्थित होते. सागरला मदत करताना मानसिक आनंद मिळाल्याचे खाडे यांनी सांगितले. वाहन मिळाल्यानंतर सागर आणि त्याच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. खाडे यांनी गेली पंधरा वर्षे आपल्याला प्रेम आणि आधार दिल्याचे सांगत सागरने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


