अंध विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे कलाविष्कार
मिरज (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय अंध दिनानिमित्त भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्व. सुशीलाबाई घोडावत निवासी अंधशाळा, नॅब हॉस्पिटल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांना अंध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. अंध विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि समाजात समानता व संवेदनशीलतेची भावना निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ, गायन, संगीत आणि विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांतर्फे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
अंध विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले, तर वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील कलागुणही समोर आले, असे नॅबचे प्रमुख राहुल देशपांडे यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, ज्योत फाउंडेशनच्या समन्वयक डॉ. प्रिया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका उज्ज्वला हिरकोडे आणि नॅबचे अध्यक्ष बन्सीलाल ओसवाल उपस्थित होते. ओमसाई शिर्के, पूर्वा इंगळे, वेदिका दहीफोडे, कांचन परांजपे, सानिया दौंड, सिद्धी पाटील, वैष्णवी पवार यांच्यासह एमबीबीएसच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.


