निर्मल हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य व कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात

0
WhatsApp Image 2026-10-15 at 12.38.44 PM

मिरज (प्रतिनिधी)
जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि सायबर सुरक्षितता आठवड्यानिमित्त तालुका विधी सेवा समिती, मिरज आणि दि मिरज अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी(दि.१४) रोजी निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, मिरज येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न झाले. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्त भारत आणि सायबर सुरक्षा या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, मिरज येथील ए. एस. राणे होते. त्यांनी आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताणतणाव, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे महत्त्व विशद केले. निर्मल हॉस्पिटलचे संस्थापक व प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी मानसिक आजारांची लक्षणे, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, योग्य उपचार व समुपदेशनाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक आजार आणि व्यसनांविषयीचे गैरसमज दूर करून वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सांगली सायबर पोलीस ठाण्याचे करण परदेशी यांनी सायबर सुरक्षेबाबत माहिती देताना ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याविषयी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी मिरज अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन कृष्णाजी माने, सचिव अ‍ॅड. तौफिक मुसा पीरखान यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूट, बोरपाडळे, कोल्हापूर आणि यशोदा कॉलेज ऑफ नर्सिंग, विजयपूर येथील विद्यार्थ्यांनीही शिबिरात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *