वेतनातील तफावतीविरोधात मिरज न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
WhatsApp Image 2026-10-16 at 9.35.18 PM

काळ्या फिती लावून कामकाज; समान कामासाठी समान वेतन देण्याची मागणी

मिरज (प्रतिनिधी)

समान कामासाठी समान वेतन मिळावे, या मागणीसाठी मिरज न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवार (दि. १६) रोजी काळ्या फिती लावून कामकाज करत आंदोलन केले. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा व तालुका न्यायालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. न्यायालयीन कागदपत्रांची हाताळणी, विविध नोंदी ठेवणे आणि न्यायालयीन प्रक्रियेतील आवश्यक कामे पार पाडण्याची जबाबदारी ते सांभाळतात. कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्या मोठ्या असतानाही वेतनात तफावत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा इशारा राज्य सरकारी न्यायालय कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *