कलाम स्ट्रीम चॅलेंज-२०२६ मध्ये खाडे शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग ; इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड
खाडे शैक्षणिक संकुल मधील ५२ विद्यार्थ्यांसह २६ शिक्षकांचा सहभाग
मिरज (प्रतिनिधी)
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी पिंपरी येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कलाम स्ट्रीम चॅलेंज-२०२६ स्पर्धेत खाडे संकुलच्या सुमारे ५२ विद्यार्थ्यांसह २६ शिक्षकांनी सहभाग घेतला. देशभरातील शाळा व महाविद्यालयांमधील २५२ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
हाऊस ऑफ कलाम, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एएसएमचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी डॉ. कलाम यांचे नातपुतणे शेख दाऊद, शेख फजलू रहमान, डॉ. अरविंद अनंत नातू, इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. सिन्हा, आयएएस अधिकारी हिरालाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी व संचालक मिलिंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर अदाटे (पश्चिम महाराष्ट्र समन्वयक) आणि विजय मगदूम (मिरज तालुका समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली एमटीडीके शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.
स्पर्धेत हरित ऊर्जा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्यसेवा, रोबोटिक्स, संरक्षण, सिंचन आणि सामाजिक विकास या विषयांवरील प्रकल्प सादर करण्यात आले. आफताब गडकरी बायोटेक आणि श्रीनिवास शिंदे यांनी संकटकाळात उपयुक्त ठरणारा ड्रोन प्रकल्प सादर केला. विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी, स्मार्ट स्कूल यांसह विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडले.
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांवर उपाय शोधावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, करुणा माने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.


