मिरजेच्या प्रा. शरद पाटील महाविद्यालयाचे जलतरण स्पर्धेत दैदिप्यमान यश

0
WhatsApp Image 2026-10-29 at 10.10.58 PM

मिरज (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आयोजित सांगली विभागीय पुरुष व महिला जलतरण स्पर्धेत लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाविद्यालयाची राष्ट्रीय जलतरणपटू योगेश्वरी महादेव कदम हिने विविध सोळा प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई करत स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले.

तिने ८० गुण मिळवत सलग सहाव्या वर्षी महिला गटातील वैयक्तिक विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील मानाचा कर्नल गुणधर देवेंद्र पाटील चषकही महाविद्यालयाने पटकाविला. नवकृष्णा व्हॅली येथील जलतरण तलावात या स्पर्धा पार पडल्या. योगेश्वरी कदम हिने फ्री स्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय आणि वैयक्तिक मेडले (आय.एम.) या प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली.

फ्री स्टाइल प्रकारात ५०, १००, २००, ४००, ८०० आणि १५०० मीटर अंतराच्या शर्यतींमध्ये तिने सुवर्णपदके मिळविली. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ५०, १०० आणि २०० मीटर, तर बॅकस्ट्रोकमध्येही ५०, १०० आणि २०० मीटर प्रकारांत तिने प्रथम क्रमांक पटकाविला. याशिवाय बटरफ्लाय प्रकारातील ५०, १०० आणि २०० मीटर शर्यतींसह वैयक्तिक मेडलेच्या १००, २०० आणि ४०० मीटर प्रकारांतही तिने सुवर्णपदकांची कमाई केली. विविध जलतरण प्रकारांतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने ८० गुणांची कमाई केली.

सलग सहा वर्षे महिला गटातील वैयक्तिक विजेतेपद मिळविण्याची कामगिरी तिने केली आहे. योगेश्वरीच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. तिच्या कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपदाचा कर्नल गुणधर देवेंद्र पाटील चषक मिळाला. या यशासाठी संस्थेच्या चेअरमन सरोज रायनाडे, मानद सचिव प्रा. एस. ए. पाटील आणि प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. संजय पाटील यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *