पदवीधर मधील अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडू नका; भाजपने आधी आत्मपरीक्षण करावे – प्रा.मोहन वनखंडे

0
WhatsApp Image 2026-10-29 at 10.19.25 PM

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांना प्रत्युत्तर
मिरज (प्रतिनिधी)
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपच्या अपयशाची जबाबदारी शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी करू नये. स्वतःच्या पराभवाची कारणे शोधण्याऐवजी मित्रपक्षावर आरोप करणे ही राजकीय अपरिपक्वता आहे, अशी टीका शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांनी केली.

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे परस्परांचा सन्मान राखून काम करणारे घटक पक्ष आहेत. मात्र, निवडणुकीत अपयश आले की मित्रपक्षाला दोष देणे, हे महायुतीच्या एकजुटीला बाधा आणणारे आहे. भाजपने उमेदवाराची निवड, संघटनात्मक काम, पदवीधरांशी संपर्क आणि प्रचाराचे नियोजन यांचे आत्मपरीक्षण करावे, असे त्यांनी सांगितले.

रोजगार, बेरोजगारी, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसह पदवीधरांच्या प्रश्नांवर मतदारांनी दिलेला कौल समजून घेणे आवश्यक आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहे. महायुती परस्पर विश्वास आणि समन्वयावर टिकली पाहिजे. मित्रपक्षावर आरोप करण्याऐवजी भाजपने पराभवाची कारणे तपासून चुका दुरुस्त कराव्यात. विजयाचे श्रेय घेण्याप्रमाणेच पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्यही नेतृत्वाने दाखवावे, असे आवाहन प्रा. वनखंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *