मिरजेतील लक्ष्य रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश
मिरज (प्रतिनिधी)
कोल्हापूर विभागीय शालेय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेत लक्ष्य रोलर स्केटिंग अकॅडमी, मिरज येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. १७ वयोगटातील या स्पर्धेत चि.पार्थ अमितकुमार टेकाम याने प्रथम, कु.रुजदा नूर मोहम्मद मुल्ला हिने द्वितीय, तर चि.आयुष प्रदीप कडोले याने तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे लक्ष्य रोलर स्केटिंग अकॅडमीसह त्यांच्या शाळेचे आणि सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला. त्यांना अकॅडमीचे प्रशिक्षक अभि टाकवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे पालकांनी विशेष कौतुक केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत तिन्ही गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रशिक्षक अभी सर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी अमितकुमार टेकाम, प्रदीप कडोले, नूर मुल्ला, राहुल क्षीरसागर, प्रदीप गिड्डे, निखिल वडियार यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


