कमला कॉलेजमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान

0
WhatsApp Image 2026-10-29 at 12.50.57 PM

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा पुढाकार

कोल्हापूर (प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज, कोल्हापूर येथे दक्षता जनजागृती सप्ताह २०२६ निमित्त ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एन.सी.सी. विभाग, आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. तेजस्विनी मुडेकर होत्या.

           कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्याची माहिती देऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता, नैतिक मूल्यांचे पालन आणि वैयक्तिक जीवनातील सत्यनिष्ठा ही भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीची महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून वर्तन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

         आकाशवाणी केंद्र, कोल्हापूरचे कार्यक्रम अधिकारी प्रविण चिपळूणकर त्यांनी आपल्या मनोगतात लाच मुक्त भारत आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता विशद केली. सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण आणि जनहिताचे विचार व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यात आकाशवाणीसारख्या प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

       अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या प्रो. डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रामाणिकपणा, शिस्त, उत्तम चारित्र्य आणि जबाबदार नागरिकत्व ही मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची जोपासना होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. सुजय पाटील यांनी केले. यावेळी एन.सी.सी. विभागाच्या समन्वयक प्रा. ज्योती लिंगरे, आकाशवाणी केंद्रातील सहकारी, लाचलुचपत प्रतिबंध विभागातील अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ तराळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मा. श्री. प्रविण चिपळूणकर यांनी केले.

  सत्यनिष्ठा हीच समृद्ध समाजाची ओळख असून, भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने आपल्या आचरणात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये जपली पाहिजेत महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *