डॉ. संजय दाभोळे यांना ‘आयएसटीई’चा ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ राष्ट्रीय पुरस्कार
आयएसटीई गोवा अधिवेशनात पुरस्कार स्वीकारताना न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूरचे विद्यमान प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे
कोल्हापूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील तंत्रशिक्षणाला जागतिक आयाम देत हजारो विद्यार्थ्यांचे करिअर उज्ज्वल घडविणारे प्राचार्य डॉ. संजय हिंदूराव दाभोळे यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून २०२६ चा ‘बेस्ट प्रिन्सिपॉल – डिप्लोमा’ पुरस्कार प्राप्त झाला. ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूरचे विद्यमान प्राचार्य असून तत्पूर्वी ते महागाव गडहिंग्लज येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकचे १२ वर्षे प्राचार्य होते. तंत्रशिक्षणातील दूरदृष्टीचे आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील त्यांच्या आतापर्यंतच्या शाश्वत योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. आयएसटीईच्या गोवा येथील अधिवेशनात २ नोव्हेंबरला हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
सुरूवातीस महागाव गडहिंग्लज येथे संत गजानन महाराज पॉलिटेक्निकची पहिली वीट रचण्यापासून माळरानात तब्बल १६ विविध शैक्षणिक संस्थाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. डाॅ. दाभोळे यांनी शिक्षणाचा गंध नसलेल्या ग्रामीण व शेतमजूर कुटुंबातील मुला-मुलींना त्यांच्या घरी जावून विश्वास व प्रोत्साहन देत तंत्रशिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी मिळवून दिल्या. करोना काळात रिलायन्स फाऊंडेशनकडून १०,००० शिक्षक आणि १,००,००० हून अधिक ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत मायक्रोसॉफ्ट टीम्स लायसन्स मिळवून देत ऑनलाईन शिक्षणाची सोय केली.
पुढे डाॅ. दाभोळे यांनी कमी झालेली प्रवेशसंख्या व आर्थिक आव्हाने समोर असलेल्या तत्कालीन न्यू पॉलिटेक्निकची धूरा आपल्या खांद्यावर घेत त्यांनी आपल्या भविष्यवेधी धोरणातून कामकाजात क्रांतिकारी बदल केले. उदयोन्मुख अभ्यासक्रमांचा समावेश, स्टार्टअप निर्मितीसाठी केंद्र शासनाचा इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) उपक्रम, एनबीए मानांकन, शिक्षणपुरक उपक्रम, विनाव्याज दहा सुलभ हप्त्यात फी भरण्याची योजना, काॅलेज बस सुविधा, परिसर सुशोभीकरण, विद्यार्थी समुपदेशन यातून त्यांनी काॅलेजला विद्यार्थीकेंद्री बनवत काॅलेजचा लौकिक उंचावला.
त्या पुढे जात डाॅ. दाभोळे यांनी उपलब्ध संसाधनांमध्ये डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेसही सुरू केले. कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांचे बढती व वेतनादी प्रलंबित प्रश्न सोडवले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, शोधनिबंध, पेटंट व निरंतर शिक्षण संस्कृती रुजवली. यातील ‘डस्ट-फ्री ब्लॅकबोर्ड डस्टर’ला भारत सरकारचे अधिकृत पेटंट मिळाले आहे. तसेच काॅलेजमध्ये ‘राजर्षी शाहू टेक सेंटर’ उभारत सोलर पॅनेल उत्पादन सुरू करत गरजू विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजना उपलब्ध करून दिली आहे.
केंद्र शासनाच्या एनएसडीसीकडून आठ प्रगत तंत्रज्ञानांचा अंतर्भाव असलेले ‘सेंटर फॉर फ्युचर स्किल्स’ एनआयटीमध्ये मंजूर करून घेत रूपये ५ कोटीच्या निधीची तरतूद मिळवली आहे. तसेच, एनआयटी आयआयसीने देशातील ५,८५६ संस्थांमधून निवडक १६ संस्थांमध्ये स्थान मिळवत फोर स्टार’ राष्ट्रीय मानांकन पटकावले आहे. राष्ट्रभक्ती व घटनात्मक मूल्यांच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या व्हेटरन्स इंडियाकडे २,३३४ हून अधिक विद्यार्थी व कर्मचारी यांची नोंदणी केल्याने एनआयटीला नवी दिल्ली येथे ‘प्राईड ऑफ नेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. दाभोळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे चर्मकार, स्थानिक फाऊंड्री कामगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना इंडस्ट्री ४.० चे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी रुपये ३.५ कोटींच्या डीएसटी-सीड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एनआयटीमध्ये अद्ययावत क्रिकेट मैदानाचे काम सुरू झाले आहे.
डॉ. संजय दाभोळे यांना प्राप्त या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेचे पदाधिकारी, संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कोल्हापूरतील शिक्षण तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
00000


