दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पाणी व चारा डेपो सुरू करा; महाविकास आघाडीचे निवेदन
मिरज (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पाणी व चारा डेपो तातडीने सुरू करावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना देण्यात आले. दुष्काळ जाहीर होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
रेशन दुकानांमधून चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी, सातबारा कोरा करावा, तसेच कर्जमाफीची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. तसेच मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कथित सावकारीविरोधात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खोत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तानाजी सातपुते, प्रा. प्रमोद इनामदार, बाळासाहेब पाटील, सूरज डवरी व गायकवाड उपस्थित होते. या मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास तहसीलदार कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला.


