किसान चौकातील १०० खाटांचे महिला रुग्णालय सुरू करा – धनंजय भिसे

0
bhise nivedan

महापालिका आयुक्तांना निवेदन; दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
मिरज (प्रतिनिधी)
येथील किसान चौक परिसरातील प्रस्तावित १०० खाटांचे महिला व नवजात बालक रुग्णालय तातडीने पूर्ण करून जनतेच्या सेवेत सुरू करावे, अशी मागणी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, मागणीची दखल न घेतल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मिरज हे वैद्यकीय सेवांचे महत्त्वाचे केंद्र असून, सांगली जिल्ह्यासह ग्रामीण भागातून हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात. गर्भवती महिला आणि नवजात बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या जुन्या रुग्णालयाच्या जागेवर हे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. जानेवारी २०२४ मध्ये भूमिपूजन, तर सप्टेंबर २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया पार पडली होती. मात्र, अद्याप रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या रुग्णालयामुळे गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीची सुविधा, नवजात बालकांना तातडीचे उपचार आणि सर्वसामान्यांना दर्जेदार शासकीय आरोग्यसेवा मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाने काम पूर्ण करून रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी भिसे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पालकमंत्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *