शहिदांना अभिवादनासाठी सांगलीतून ‘शहीद दौड’

0
samit kadam

४७० किमीचे अंतर पार करणार; पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या हस्ते प्रारंभ
मिरज (प्रतिनिधी)
मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई अशा ४७० किलोमीटरच्या ‘शहीद दौड’ला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि ‘शहीद इंटरनॅशनल’चे चेअरमन समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून १२ धावपटूंना रवाना करण्यात आले.


शहीद इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यंदा २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ही दौड आयोजित केली आहे. हातात मशाल आणि भारताचा तिरंगा घेऊन १२ धावपटू मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. सहा दिवसांच्या प्रवासात ते सुमारे ४७० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करणार आहेत.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलातील जवानांनी प्राणांची बाजी लावून अतिरेक्यांचा मुकाबला केला. या शहिदांचे बलिदान नव्या पिढीला समजावे, त्यांच्या शौर्याची प्रेरणा मिळावी आणि तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी, हा या दौडीमागील मुख्य उद्देश आहे. सांगली, तासगाव, विटा, पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई, चेंबूर आणि माटुंगामार्गे ही दौड मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल.

दौडीत पंढरीनाथ मारुती वडर, सुशांत बंडू मोरे, प्रसाद निवृत्ती कारंडे, आयुष कुमार चोरमले, आदर्श अजित अकिवाटे, जय अनिल महापुरे, सक्षम कुमार हिरवे, आर्यन मारुती मोरे, स्वप्नील माने, आदित्य लोखंडे, जयदीप घारगे आणि प्रतीक नलवडे सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रविपाटील, ‘मिरज ग्रामीण’चे पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, डॉ. रियाज मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दौडीच्या यशस्वी आयोजनासाठी शहीद इंटरनॅशनलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *