महापालिकेतील प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्षावर आ. नायकवडींची नाराजी; सुधारणा न झाल्यास हस्तक्षेपाचा इशारा

0
naikwadi

मिरज (प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या एमआरडीपी योजनेअंतर्गत सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांसाठी सुमारे ३ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी पाण्याचा निचरा आणि संबंधित विकासकामांसाठी ५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कामांच्या अंमलबजावणीवरून महापालिकेतील काही लोकप्रतिनिधींकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आ. इद्रिस नायकवडी यांनी केला.

यासंदर्भात बोलताना आ. नायकवडी म्हणाले की, एमआरडीपी योजनेतील कामांसाठी महापालिकेने आवश्यक ती सहमती देणे अपेक्षित होते. प्रशासकांच्या कार्यकाळात ही सहमती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या महापालिकेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक अपेक्षा किंवा इतर कारणांसाठी या कामांमध्ये अडथळे आणणे योग्य नाही. शहराच्या विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या महापालिकेत सुरू असलेली परिस्थिती समाधानकारक नाही. लोकप्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी काहींकडून बेजबाबदार वक्तव्ये आणि अनाठायी मागण्या केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

महापालिका आयुक्त महापात्रा हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. अमरावती येथेही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. महापालिकेला एक अनुभवी अधिकारी मिळाला असून, त्यांच्या कामाचा उपयोग शहराच्या विकासासाठी करून घेणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. प्रशासन एका बाजूला आणि लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती निर्माण होणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही.

याशिवाय महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठीही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. गेल्या दहा महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून कोणतेही ठळक काम झाल्याचे दिसत नाही. शहराच्या विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आणि उपलब्ध निधीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सध्याच्या परिस्थितीत बदल झाला नाही आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली गेली नाही, तर महानगरपालिकेच्या कामकाजाकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावे लागेल, असा इशाराही आ. नायकवडी यांनी दिला.

महापालिकेतील या परिस्थितीची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंत पोहोचली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाला सहकार्य करत नसल्याबद्दल खंत व्यक्त केल्याचे आ. नायकवडी यांनी सांगितले. तसेच प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून येथील परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांनाही देण्यात आली असून, ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *