ऊस उत्पादकांना प्रतिटन ५० रुपयांचा फरक तातडीने द्या
‘शिवशक्ती शुगर्स’ला शिवसेनेचा चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलनाचा इशारा
मिरज (प्रतिनिधी)
गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस बिलाच्या दरातील प्रतिटन ५० रुपयांची फरकाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख किरण कांबळे यांनी कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील सौंदत्ती येथील शिवशक्ती शुगर्स कारखाना व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले आहे. चार दिवसांत फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास ‘शिवसेना स्टाईल’ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
निवेदनानुसार, २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याने प्रतिटन ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला होता. मात्र, महाराष्ट्रातील काही भागांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ३०० रुपये दराने बिल अदा करण्यात आले आहे. त्यामुळे जाहीर दरानुसार प्रतिटन ५० रुपयांची फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा कांबळे यांनी केला.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. शेतीसाठी लागणारी खते, औषधे, मजुरी आणि पाणी यांचा खर्च वाढत असताना ऊस बिलातील फरकाची रक्कम रखडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे. कारखाना व्यवस्थापनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन चार दिवसांच्या आत प्रतिटन ५० रुपयांची फरकाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने कारखाना व्यवस्थापनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला. यावेळी राहील शेख, स्वरूप कांबळे, दिया कांबळे, हनुमंत पवार व लक्ष्मण कांबळे व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


