तासगाव तालुक्यातील चोरटे गजाआड ; माधवनगर येथे एलसीबीची कारवाई

सांगली (प्रतिनिधी)
तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रवीण भगवान गायकवाड (वय २८, रा. मळणगाव) आणि रोहित अदिकराव सपकाळ (वय २३, रा. गौरगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
२१ जुलै रोजी सकाळी साडेपाच ते सहा दरम्यान प्रियांका अर्जुन यादव या वज्रचौंडे गावात फिरायला गेल्या असताना, एकटे असल्याचा फायदा घेत आरोपींनी दुचाकीवर येत त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन केले. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील प्रकाश पाटील आणि सागर टिंगरे यांना माधवनगर परिसरातील जुना जकात नाका येथे दोन संशयित चोरटे चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान प्रवीणच्या पॅन्टच्या खिशातून सोन्याची चेन सापडली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दोघांना चोरीस गेलेली चेन आणि वापरलेली दुचाकीसह तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार आणि त्यांचे सहकारी सागर लवटे, दरिबा बंडगर, संदीप गुरव, अमर नरळे, उदयसिंह माळी, अमिरशा फकीर, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, नागेश खरात, संदीप माने, संदीप नलावडे व अनिल कोळेकर यांनी केली.