आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत – मनोज जरांगे-पाटील

मिरज (प्रतिनिधी)
सांगली ही क्रांतिकारकांची क्रांतिकारक भूमी आहे. मराठा आरक्षणाच्या क्रांतीत सांगलीकर मागे थांबणार नाहीत. यावेळी क्रांती घडणार आहे. सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक घराघरातून मराठा समाज मुंबईत येणार आहे. यावेळी आरक्षण घेणार, विजय मिळवणार; त्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. सांगली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सगळ्यांना जागृत करून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मिरज येथे त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आणि कार्यकर्त्यांची संवाद साधला. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाज बांधवांना मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील किंवा राज्यात मराठा समाज एकत्र येत नाही असे बोलले जाते. मात्र सांगली येथे आल्यानंतर सकाळपासून समाज बांधव कार्यकर्ते भेटायला येत आहेत. मराठा समाज एकत्र येत नाही म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. या पूर्वीपेक्षाही मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत येणार आहे. आंदोलनासंदर्भात शासनाला चर्चा करायचे असेल तर ती २७ ऑगस्ट पर्यंत करावी. एकदा आंतरवाली सराटी सोडल्यानंतर आम्ही कुणाचेही ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी सांगलीच्या क्रांतिकारी भूमीतून आवाहन करतो. त्यांनी समाजाच्या बाजूने उभे राहावे. समाज तुम्हाला विसरणार नाही. तुमच्यात मतभेद किती दिवस ठेवाल. दोघांनी विचाराने राहून या लढ्यात यावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावे, असे आवाहन त्यांनी केले.