वारणा धरणातून ३० हजार क्युसेक विसर्ग;

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शित्तूर वारुण (शिवाजी नांगरे )
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातील वक्रद्वार उघडून २९,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर विद्युतगृहातून १,६३० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण ३०,६३० क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, वाढलेल्या पाण्यामुळे वारणा नदीची पातळी प्रचंड वाढली असून शित्तूर-आरळा पूल, चरण-सोंडोली पूल तसेच सोंडोली-मालेवाडी पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.