प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर- डॉ. ज्योती आदाटे

अष्टभुजा प्रतिष्ठानमार्फत चालविण्यात आलेल्या मोफत प्रशिक्षणाचा समारोप
सांगली (प्रतिनिधी)
महिला कुठेच कमी नसतात. त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे. आपण किती कमावतो, यापेक्षा जिद्द ठेऊन स्वबळावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो हे फार महत्त्वाचे आहे. चिकाटीने कष्ट करीत राहिला तर यश नक्कीच मिळेत, तसेच आपल्या वस्तूंचे मार्केट सुध्दा मिळवता आले पाहिजे, आत्मनिर्भरपणा येण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ज्योती आदाटे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त स्कील इंडिया अंतर्गत अष्टभुजा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालविण्यात आलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षणाचा समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. त्या पुढे म्हणाल्या, संस्था महिलांसाठी जे कार्यक्रम राबवित आहे, त्याचे कौतुक आहे. अशी प्रशिक्षण शिबिरर प्रत्येक भागात झाली पाहिजेत, जेणेकरून महिला स्वबळावर उभ्या राहतील. यासाठी काही मदत लागेल ती करावयास आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शेळके, तसेच अष्टभुजा प्रतिष्ठानच्या समन्वयक आयेशा मुलाणी, प्रशिक्षक निलम डाके, निरंजन परमाने, प्रमोद जाधव, मीना जांबोटी, सुनंदा राठोड, प्रभावती आदाटे, अंनिसची कार्यकर्ती प्रियांका तुपलोंडे उपस्थित होते. ज्योती आदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.