शिक्षक संतोष यादव यांच्या संकल्पनेतून अनिष्ट प्रथांचे होळीमध्ये दहन
मनपा शाळा क्रमांक १ मध्ये सामाजिक जनजागृतीचा अभिनव उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात ठोस भूमिका घेत मनपा शाळा क्र.१ येथे होळीच्या पावन निमित्ताने सामाजिक जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संतोष यादव सर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजातील कुप्रथांविरोधात प्रभावी संदेश दिला.
होळीच्या दहन सोहळ्यात बालविवाह, सतीप्रथा, जातीय भेदभाव, स्त्रीभ्रूणहत्या, बहुपत्नीत्व, मानवी तस्करी, अंधश्रद्धा, जादूटोणा प्रथा, देवदासी प्रथा, स्त्री-पुरुष असमानता, घरगुती हिंसा, दारू व व्यसनाधीनता, बंधमजुरी (वेठबिगारी), मुलगा-प्राधान्याची मानसिकता, ऑनर किलिंग (सन्मानहत्याकांड), घटस्फोटित व विधवांवरील अन्याय, बालमजुरी, सामाजिक बहिष्कार, दहेज प्रथा (हुंडा प्रथा) आणि धार्मिक अंधानुकरण अशा विविध अनिष्ट प्रथांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी मानवी साखळ्या तयार करून “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता” या मूल्यांचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या हातात सामाजिक संदेश देणारे बॅनर व फलक होते. “अनिष्ट प्रथा नष्ट करा”, “शिक्षण घ्या, समाज घडवा”, “अंधश्रद्धा दूर करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने फेरी काढत नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. या उपक्रमामुळे शाळा परिसरात सामाजिक परिवर्तनाचा सकारात्मक संदेश पोहोचला.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता प्रवीण पवार, संतोष यादव, शिक्षिका निर्मला माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्त्री-पुरुष समानता, मानवता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करून सुसंस्कृत व समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.


