संवेदना बोथट झाल्यामुळेच अनेक अनर्थ घडतायत – प्रा.मिलिंद जोशी

सांगली (प्रतिनिधी)
विकासाच्या नावाखाली चंगळवाद वाढल्यामुळेच समाजातील अनेक घटकांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. त्यामुळेच समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एवढेच नव्हे तर समाजात टिकाऊपणा वाढण्याऐवजी दिखाऊपणा वाढला आहे ही बाब चिंताजनक असून समाजाच्या विकासासाठी घातक आहे. संवेदनशील समाजाला खरे भवितव्य आहे. असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
सांगली येथील राज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने कृषीभूषण दादासाहेब ठिगळे यांच्या स्मरणार्थ सांगली येथील रोटरी क्लबच्या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांचे ‘ साहित्य,समाज आणि संवेदना ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर होत्या.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करताना प्रा.संजय ठिगळे म्हणाले की, आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ग्रामीण विकास संस्था स्थापन केली आहे. याप्रसंगी प्रा.मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समीक्षक प्रा.अविनाश सप्रे , संपादक महेश कराडकर व ऋतुराज ठिगळे यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली येथील ज्ञानदीप वाचनालयास पुस्तके व निधी भेट देण्यात आला.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा.जोशी म्हणाले की,समाजाला संवेदनशील साहित्यिक व विचारवंतांची गरज आहे. त्यांच्या संवेदना अधिक बोथट झाल्या तर समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही. त्यामुळे संवेदनशील माणूस निर्माण होईल अशी व्यवस्था तयार करावी लागणार आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या की, भाषा ही माणसाला जोडण्याचे कार्य करते. संस्कृती ही नदीसारखी वाहती असली पाहिजे त्याशिवाय समाजाचा खरा विकास होणार नाही.असते. माणूस हा विकासाच्या नावाखाली निसर्गापासून आणि मातीपासून दूर चालला आहे हे समाजाच्या दृष्टीने हिताचे नाही. उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. कार्यक्रमास प्रा. शामराव अण्णा पाटील, शिवराज काटकर,गौतमीपुत्र कांबळे, दि.बा.पाटील,अंजुमन खान, धनंजय जोशी,राजेंद्र मेढेकर ,डॉ.अनिल मडके. सौ.मालन मोहिते, डॉ. डी. जी. कणसे त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.