सेवासदनचे डॉ. रवीकांत पाटील यांच्या पुढाकाराने दुबईत मोफत आरोग्य तपासणी

0
IMG-20250829-WA0116

हृदय आरोग्य जनजागृती अभियानअंतर्गत दुबईत भारतीयांसाठी राबवला उपक्रम

मिरज (प्रतिनिधी)
दुबईतील ‘दुबई हेल्थकेअर सिटी’ येथे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “हृदय आरोग्य जनजागृती अभियान” राबवण्यात आले. यामध्ये दुबईत राहणाऱ्या भारतीय कामगार, महिला व सहाय्यक वर्गासाठी मोफत हृदय तपासणी, समुपदेशन, योग, आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. दुबईतील अनिवासी भारतीय, कुशल कामगार, चालक व सहाय्यक कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला.

याप्रसंगी डॉ. रविकांत पाटील म्हणाले, हृदयरोग हे एक कटू वास्तव आहे. हृदयरोग तरुणांमध्येही वाढतो आहे. आपले ‘कम्युनिटी हिरोज’ शहर उभारतात आणि चालवतात; पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ही मोहीम फक्त वैद्यकीय शिबिर नाही, हा एक संवाद आहे. हृदयरोग-मुक्त समाज घडवायचा असेल, तर कॉर्पोरेट हेल्थकेअर मॉडेलच्या पलीकडे जाऊन नागरी समुदायाशी जोडले गेले पाहिजे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहम्मद अलख्यार यांनी ताणतणाव आणि छातीत वेदना वाढण्याचा थेट संबंध स्पष्ट केला. ताण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. डॉ. पाटील यांचा उपक्रम महत्त्वाचा आहे, कारण तो मुळ कारणाला हात घालणारा आहे. औषधं घेणे पुरेसं नाही तर दैनंदिन सवयींमध्ये बदल अपेक्षित असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. पाटील आणि त्यांच्या टीमने शंभरहून अधिक नागरिकांची तपासणी केली. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आणि आंध्र प्रदेशातील अनेक कामगार, लहान व्यावसायिक, तसेच कुटुंबवत्सल महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. यातील अनेक जणांनी आजपर्यंत कधीही हृदयाची तपासणी केली नव्हती. डॉ. रवीकांत पाटील यांनी यावेळी “स्मार्ट हार्ट स्क्रीनिंग” जनजागृती मोहिमेची घोषणा केली. ही मोहीम दुबईभर राबवली जाणार आहे. याप्रसंगी आय. पी. ग्लोबल कन्सल्टन्सीचे सल्लागार डॉ.अनिल बनकर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमास डॉ. मोहम्मद एल्बाझ, सोमनाथ पाटील, चंद्रशेखर जाधव, किशोर मुंढे, सचिन कदम, साक्षी मोरे, अनिल कदम, डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. प्रिया, ऍड. सिद्धार्थ कांबळे, संदीप सौंदडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *