महापालिका क्षेत्रात देशी झाडांची लागवड करावी- निसर्गप्रेमींची मागणी

सांगली (प्रतिनिधी)
महापालिकेने शहरातील हिरवे अच्छादन वाढविण्यासाठी व हवा गुणवत्ता तीसपर्यंत खाली आणण्यासाठी येत्या तीन वर्षात ‘हरित संगम’ उपक्रमातंर्गत एक लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामध्ये विदेशी झाडे लावली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. विदेशी झाडे स्थानिक माती, हवामानाशी जुळवून घेत नाहीत. त्यामुळे देशी झाडे लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे तबरेज खान, रोहन पाटील, कौस्तुभ पोळ, अमोल जाधव, हर्षद दिवेकर, अरविंद सोमण, विशाल कोठावळे, अनिकेत ढाले, सचिन हजारे यांनी निवेदन दिले असून आराखड्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
शहराचे तापमान नियंत्रित करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि नागरिकांना निरोगी वातावरण देणे या हेतूने मनपा हा उपक्रम राबवत आहे. पण विदेशी झाडे स्थानिक माती व हवामानाशी जुळवून घेत नाहीत. अनेकदा अशा झाडांमुळे जमिनीतील पाण्याचा असमतोल बिघडतो, जैवविविधतेवर परिणाम होतो. तसेच स्थानिक पक्षी प्राण्यांना आवश्यक अधिवास उपलब्ध राहत नाही. वादळात विदेशी झाडांच्या फांदया पडतात. याउलट कडुलिंब, चिंच, आंबा, शेंद्री, कुसूम, अर्जुन, हिरडा, बेहडा यांसारखी झाडे केवळ दीर्घायुषी आणि छायादार नसून स्थानिक पक्ष्यांचे घरटे, प्राण्यांचा अधिवास आणि औषधी गुणधर्म यांमुळे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवतात. या झाडांमुळे पाण्याचा साठा वाढतो तसेच मातीची सुपीकता टिकून राहते.
वनस्पती व देवराई अभ्यासक रोहन पाटील म्हणाले, मोनोकल्चर म्हणजे एकाच प्रजातीची एकसलग झाडे आणि विदेशी झाडे लावणे हे दोन्ही निसर्गनियमांविरुध्द आहे. विदेशी झाडांचे दुष्परिणाम सांगलीने अनुभवलेले आहेत. स्थानिक जैवविविधतेला उपयोगी प्रदेशनिष्ठ झाडे लावली जावीत. माणसाला सगळे मिळाले आहे. त्यामुळे सुशोभिकरणाची खरी व्याख्या पर्यावरणीय घटकांना संभाळणे हीच आहे.