मिरजेत आरसेटीमार्फत ब्युटी पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
बँक ऑफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली यांच्या वतीने आरसेटी सांगलीतर्फे मिरजेत पंढरपूर रोड, रमा उद्यान शेजारी मोफत ३५ दिवसीय “ब्युटी पार्लर मॅनेजमेंट – बेसिक ते अॅडव्हान्स” प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण भागातील युवती व महिलांना कुशल उद्योजक बनवणे, बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराकडे वळवणे व त्यांचे उत्पन्न वाढवणे हा होता.
प्रशिक्षणादरम्यान मेकअपचे सर्व प्रकार, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मॅनिक्युअर-पेडीक्युर, डी-टॅन व ब्लीचिंग, फेशियलचे विविध प्रकार, अरोमा थेरपी, पिंपल्स ट्रीटमेंट, हेअर कटिंग व स्टाईल्स, हेअर स्ट्रेटनिंग-कलरिंग-स्पा, बॉडी मसाज-पॉलिशिंग, ब्रायडल मेकअप, मेहंदी, नेल आर्ट व टॅटू आदींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ब्युटी पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅल्व्हॅनिक मशीन, हाय फ्रिक्वेन्सी मशीन, फुट मसाजर यांचा वापर प्रत्यक्ष शिकविण्यात आला.
याशिवाय व्यावसायिक दृष्टीने उद्योजकता विकास, करिअर संधी, डिजिटल स्किल्स, बेसिक अकाउंटिंग-बुक कीपिंग, बँकिंग, शासकीय योजना, मार्केट सर्वेक्षण, मार्केटिंग, संवाद कौशल्ये व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शन लाभार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून सांगलीचे माजी जिल्हा अग्रणी प्रबंधक राजेंद्र यादव , सौ. वीणा रेळेकर, आरसेटी संचालक महेश पाटील, सौ. कृष्णाली शिवशरण, प्रदीप साळुंखे व प्रवीण पाटील उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचा लाभ सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील पात्र व गरजू महिलांनी घेतला. यावेळी आरसेटी संचालक महेश पाटील यांनी लवकरच होणाऱ्या टू व्हीलर दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्ती व सेवा, मेन्स पार्लर, कॉस्ट्यूम ज्वेलरी व सॉफ्ट टॉईज या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.