खाडे शैक्षणिक संकुलमध्ये करियर मार्गदर्शन चाचणीस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज (प्रतिनिधी)
दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुल, कॉज टू कनेक्ट फाउंडेशन व ब्रेनबर्ग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन चाचणी व पालकांना त्यांच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, स्मरणशक्ती व विश्लेषणशक्ती तपासण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी सांगितले.
या चाचणीस शाळेतील १० वी च्या ७५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला. ब्रेनबर्गच्या कामाचे प्राथमिक उद्दिष्ट समाजातील वंचित क्षेत्रांना शैक्षणिक संस्थांना उच्च दर्जा देणे आहे. ग्रामीण भागामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये करियर बद्दल जागरकता निर्माण करणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचे योग्य मापन करणे, त्यांना अपेक्षित मार्गदर्शन, समुपदेशन करणे या गोष्टी प्रामुख्याने ब्रेनबर्ग फाऊंडेशन तर्फे केल्या जातात. याच उद्धिष्ठांतर्गत खाडे स्कूलमध्ये या शिबिराचे व चाचणीचे आयोजन केले होते.
ब्रेनबर्ग फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण दरवडे यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास तसेच करिअर निवडीसाठी योग्य दिशा मिळविण्यास ही चाचणी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. मुलांच्या या चाचणीनंतर मिळालेल्या गुणांच्या आधारे पालकांशी सुसंवाद साधत मुलांच्या करियरसाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे पालकांनाही मुलांच्या करिअर विषयी थोडी कल्पना येण्यास मदत झाल्याचे चित्र दिसत होते. तसेच शाळा मुलांसाठी करत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे संतुष्ट व समाधानी असल्याचा सूर पालकांमधून उमटत असल्याचे दिसून आले.
या उपक्रमासाठी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने, कॉज टू कनेक्ट फाउंडेशन च्या स्कूल प्रोग्राम हेड दिपाली खैरमोडे, सूफियान नदाफ, ब्रेनबर्ग फाऊंडेशनचे अक्षय देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.