मिरज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा गटाने लढवावा
राष्ट्रवादी मिरज विधानसभाक्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे व पदाधिकाऱ्यांची मागणी
मिरज (प्रतिनिधी)
मिरज विधानसभा मतदार संघात येथील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत. राष्ट्रवादीकडे येथे प्रबळ पदाधिकारी व गट असल्याने मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष, माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मिरज मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.
यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की, पक्षातर्फे मतदार संघात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. येथील राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांची लाडकी बहीण योजना समितीमध्ये समावेश आहे. त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल वातावरण आहे. येथील मतांची सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला अनुकूल आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजितदादा पवार गटाला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे महादेव दबडे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हाउपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.