आरोग्य, शिक्षण व पर्यावरण रक्षणासाठी रोटरीचा पुढाकार : डॉ. सुहास जोशी
एचपीव्ही लसीकरणासाठी रोटरी प्रयत्नशील; रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सांगली प्रतिनिधी
आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब नेहमीच पुढाकार घेत आला असून, सामाजिक कार्यासाठी समविचारी नवीन सदस्यांनी रोटरीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी प्रांतपाल (२०२८-२९) नियुक्त डॉ. सुहास जोशी यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल तारळेकर, उपाध्यक्षपदी ॲड. गणेश पाटील, सचिवपदी स्वप्निल पाटील आणि खजिनदारपदी प्रवीण गोडबोले यांची निवड करण्यात आली. डॉ. सुहास जोशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. कार्यक्रमास सहायक प्रांतपाल ॲड. बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जोशी म्हणाले की, जगभरात पोलिओ निर्मूलन मोहिमेत रोटरीने मोलाचे योगदान दिले आहे. आता किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण अभियानावर विशेष भर देण्यात येत असून, त्यासाठी रोटरी विविध स्तरांवर काम करत आहे. समाजाच्या आरोग्याबरोबरच शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही रोटरीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात एन. डी. पाटील नाईट कॉलेजच्या ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर योजनेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचा डॉ. सुहास जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष उदय कुलकर्णी यांनी स्वागत केले, तर पाहुण्यांचा परिचय राजेंद्र मेढेकर यांनी करून दिला. क्लबच्या कार्यकारिणीत प्रमोद चौगुले, आर. डी. जाधव, राजेंद्र मेढेकर, विनोद पाटील, तानाजी बोराडे, संदीप नाईक, विनायक काळे, संजीव पाटील, विशाल भगत आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमास व्यावसायिक श्रीकांत तारळेकर, तुषार तारळेकर, गिरीश तंगडी तसेच रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रवीण गोडबोले यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.


