सूरज साखरेला संपवण्याची सुपारी घेणारा राकेश कारंडे जेरबंद

0
ChatGPT Image Jul 21, 2026, 09_06_56 PM

एलसीबीची कारवाई; रफीक-शहाबाजच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ,

कोल्हापूर (प्रतिनिधी)

पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्या खुनाचा कट रचून त्याला संपवण्याची सुपारी घेणारा सराईत गुन्हेगार राकेश किरण कारंडे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मंगळवारी अटक केली. प्राथमिक तपासात कारंडेनेच रफीक मुल्ला आणि शहाबाज मुल्ला या दोघांना सूरज साखरेवर गोळीबार करण्याचे काम दिल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र कारंडेने ही सुपारी नेमकी कोणाकडून स्वीकारली, याचा तपास अद्याप सुरू असून, या कटामागील मुख्य सूत्रधार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल, असा विश्वास एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी व्यक्त केला.

१६ जुलै रोजी दुपारी नवीन वाशी नाका परिसरातील शरयू प्लाझा इमारतीजवळ सूरज साखरे हा आपल्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आला असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत रफीक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला (वय ३९, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) आणि शहाबाज राजू मुल्ला (वय २३, रा. मणेर मळा, कोल्हापूर) या दोघांना अटक केली होती. चौकशीत दोघांनीही गोळीबार केल्याची कबुली दिली.

या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीत सराईत गुन्हेगार राकेश कारंडे यानेच आपल्याला सूरज साखरेला ठार मारण्याची सुपारी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने मंगळवारी सकाळी कारंडेला अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच यापूर्वी अटक करण्यात आलेल्या रफीक आणि शहाबाज यांच्या पोलीस कोठडीतही २४ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राकेश कारंडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीसह पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात कारंडेने सूरज साखरेला संपवण्याचा कट रचून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रफीक आणि शहाबाज यांचा वापर केल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी गावठी पिस्तुलाची व्यवस्था, रेकी आणि हल्ल्याचे नियोजन यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र या संपूर्ण कटामागील ‘मास्टरमाईंड’ अद्याप समोर आलेला नाही. कारंडेने नेमके कोणाच्या सांगण्यावरून ही सुपारी स्वीकारली, त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला होता का, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. शहरातील एका बड्या गुन्हेगारी टोळीशी कारंडेचे पूर्वी संबंध असल्याची माहितीही पोलिसांकडे असून, त्या अनुषंगानेही चौकशी सुरू आहे.

या प्रकरणातील तिघे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असले तरी सूरज साखरेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्यामुळे एलसीबीची स्वतंत्र पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत असून, कारंडेकडून होणाऱ्या चौकशीतून या कटाचा खरा सूत्रधार आणि संपूर्ण षड्यंत्र उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *